दोन्ही गावातील 156 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण
28 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील 55 हजार शेतकऱ्यांची यादी उपलब्ध होणार
चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राजुरा या तालुक्याच्या गावी व सावली तालुक्यातील साखरी या गावी आधार प्रमाणीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये या दोन्ही गावात 156 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये 28 फेब्रुवारी पर्यंत 55 हजार शेतकऱ्यांची यादी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थ ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली आहे.
आज सकाळीच या दोन गावात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शुभारंभ करण्यात आला. राजुरा व सावली येथील तहसीलदार अनुक्रमे डॉ. रवीद्र होळी, पुष्पलता कुमरे तसेच तालुका उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियानाअंतर्गत राजुरा या तालुक्याच्या गावात व सावली तालुक्यातील साखरी या गावांची आधार कार्ड प्रमाणीकरण संदर्भात निवड झाली होती. ही निवड प्रायोगिक तत्त्वावर होती. पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी योजनेस पात्र शेतकऱ्यांची यादी आज लावण्यात आली होती. या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी मूळ आधार कार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर या महत्त्वाच्या कागदपत्रासह आपले आधार सेवा केंद्रांमध्ये जाऊन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये आपले आधार प्रमाणीकरण झाल्याची खातरजमा करायची होती. ज्या लोकांचे आधार कार्ड आज प्रमाणित करण्यात आले आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन लक्ष रुपये राज्य शासनामार्फत जमा केले जाणार आहे.
राजुरा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 49 खातेधारक तर तर अन्य बँकेचे 87 खातेधारक असे एकूण 136 खातेधारक आहेत. त्यापैकी आज दोन्ही बँका मिळून हे 46 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.
सावली तालुक्यातील साखरी या गावांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 167 तर अन्य बँकेचे 11 खातेधारक आहे. एकूण 178 पैकी आज 112 खाते धारकांचे प्रमाणिकरण पूर्ण करण्यात आले.
आज महाराष्ट्रात संपूर्ण राज्यभर ही मोहीम सुरू होती. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. सावली तालुक्यातील साखरी येथे तहसीलदार पुष्पलता कुमरे, सहकार अधिकारी श्रेणी-1 सुषमा शिंदे, नायब तहसीलदार प्रवीण चिडे यांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता.
राजुरा येथे आजच्या प्रक्रियेमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, तहसीलदार डॉ रवींद्र होळी, तालुका उपनिबंधक ऐ.आर. तुपट सहभागी झाले होते.
प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम राज्य शासनाकडून जमा केली जाणार आहे. त्यामुळे दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती राज्य शासनाकडून होत असल्याबद्दल यावेळी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment