मराठी भाषा गौरव दिनाला मान्यवरांचे मार्गदर्शन
चंद्रपूर, दि. 27 फेब्रुवारी : कवी, भाषातज्ञ, पत्रकार, प्राध्यापक, निवेदक, संचलक, अधिकारी आणि मराठी भाषा व पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आज मराठी भाषा गौरव दिन चंद्रपूर मध्ये साजरा करण्यात आला. भाषा जतन व संवर्धन ही आमची कौटुंबिक जबाबदारी असून ती आणखी प्रभावीपणे पार पाडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी चंद्रपूरचे प्रख्यात कवी इरफान शेख यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालय व आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन प्रशासकीय भवनातील माध्यम केंद्रात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला, साहित्य अकादमी ते प्रतिष्ठित साहित्य संस्थामार्फत गौरान्वित कवी इरफान शेख, भाषातज्ञ तथा जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम, ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार व जनसंवाद विद्या विभागाचे प्रमुख डॉ.पंकज मोहरील, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके जिल्हा उद्योजकता व मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांच्यासह विविध माध्यमात काम करणारे पत्रकार आकाशवाणीसाठी वृत्त लेखन व निवेदन देणारे निवेदक, कार्यक्रमांचे बहारदार संचलन करणारे संचलक, वृत्तपत्रविद्या विभागात शिकणारे पत्रकार, जिल्हा उद्योजकता व मार्गदर्शन कार्यालयात प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी, मराठी विभागाचे प्राध्यापक व मराठी भाषेवर प्रेम करणारे अनेक जण या कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कवी इरफान शेख यांनी यावेळी भाषा ही आपल्या आईप्रमाणे असते. जो जिथे जन्मला ती त्याची भाषा असते. त्यामुळे आपल्या कलेमध्ये, कौशल्यामध्ये, संवादामध्ये, व्यक्त होण्यामध्ये आपल्या मातृभाषेचा वापर केला गेला पाहिजे. भाषा जतन व संवर्धन ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून ज्या ठिकाणी तुम्ही राहता ती भाषा तुमच्या व्यवहाराची संवादाची भाषा झाली पाहिजे, याकडे कटाक्षाने लक्ष वेधण्याच्या आवाहन केले. यावेळी त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मागणीवरून ' माझ्यातला कवी मरत चाललाय ' या सुप्रसिद्ध कवितेचे सादरीकरण देखील केले.
जिल्ह्यामध्ये कोषागार अधिकारी म्हणून काम करणारे, मात्र भाषा तज्ञ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी यावेळी 11 कोटी लोकांची मराठी भाषा ही जागतिक भाषा करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. उपस्थित भाषाप्रेमी व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भात उपलब्ध असणाऱ्या ज्ञान कोषापासून तर शब्दकोष, लोकभाषा कोष, बोलीभाषा कोष, वेळो-वेळी संदर्भासाठी वापरण्याचे आवाहन केले. एखादी भाषा जगाची भाषा होताना ती लष्कराची भाषा झाली पाहिजे, ती प्रशासनाची भाषा झाली पाहिजे, आर्थिक व्यवहाराची भाषा झाली पाहीजे.अनिवार्य प्रमाणे किंवा प्रसंगी सक्तीने देखील मराठी भाषेचाच वापर जेव्हा होईल, त्यावेळेस या भाषेचे आयुष्य वाढेल. भाषा मोठ्याप्रमाणात बोलल्या गेल्यास भाषेचे संवर्धन व संरक्षण होईल, असे विचार त्यांनी मांडले.
ज्येष्ठ पत्रकार व जनसंवाद विद्या विभाग प्रमुख डॉ. पंकज मोहरील यांनी यावेळी वृत्तपत्रांमध्ये वापरण्यात येणारी भाषा, त्याची अचूकता, त्याचा पडणारा प्रभाव आणि मराठी भाषेच्या संवर्धन व संरक्षणामध्ये वृत्तपत्राने आजपर्यंत निभावलेली भूमिका मांडली. अचूक शब्दांची चपखल निवड ही पत्रकारांच्या भाषाशैलीचे वैशिष्ट्य असते. पत्रकारितेमध्ये डोक्यात चळवळ आणि जिभेवर अचूक शब्दांचे भांडार असणे गरजेचे असते. आपले वृत्तपत्र वाचून सर्वसामान्य जनता भाषादेखील शिकत असते. त्यामुळे पत्रकार एक भाषा शिक्षक देखील असतो. याची जाणीव पत्रकारांनी ठेवावी. वृत्तपत्रविद्या विभागामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील हे दायित्व समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. चुकीच्या शब्दप्रयोगाबाबतची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना भाग्यश्री वाघमारे यांनी मराठी भाषेच्या संवर्धन व संरक्षण म्हणून काम करणाऱ्या विविध विभागातील तज्ञांनी येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन शांताराम मडावी यांनी केले. यावेळी यावेळी उपस्थित मुलांनी काव्यवाचन व गीत वाचनात देखील सहभाग नोंदवला.
No comments:
Post a Comment