LEADING NEWSPAPER AND DIGITAL WEB PORTAL

Saturday, February 29, 2020

देश घडविणारे विचार पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने मांडले जावेत : ना.विजय वडेट्टीवार


Ø  चंद्रपुर प्रेस क्लबच्या वार्षिक समारंभात न्यायमूर्ती मदनलाल टहलियानी यांचा सन्मान
Ø  ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांनी पत्रकारांना केले मार्गदर्शन

Ø  बदलाची सुरुवात स्वतःपासून करण्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 फेब्रुवारी : पत्रकार हा जनतेचा असावा. तो पक्षाचा विचाराचा नसावा. या देशाची लोकशाही बळकट करणे, हीच तुमची दिशा आणि हाच तुमचा विचार असावा, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले. चंद्रपुर प्रेस क्लबच्या चंद्रपूर गौरव सन्मान सोहळा व वार्षिक समारंभामध्ये ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर, राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या गावचे मूळ निवासी असणारे सत्कार मूर्ती, महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त मदनलाल टहलियानी, दिल्लीतील पत्रकारांमधील मराठी चेहरा, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे, संजय रामगिरवार उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी बदलत्या काळात देखील लोकशाही व्यवस्थेमध्ये पत्रकारितेचे महत्व अबाधित असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, आजच्या काळाची तुलना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वृत्तपत्रातून मांडलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीशी होऊ शकत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषितांसाठी आपल्या वृत्तपत्रातून मांडलेल्या विचारांची होऊ शकत नाही. पण आजच्या समाजव्यवस्थेला आवश्यक असणारा विचारांचा प्रहार करण्याची ताकत आजही माध्यमांमध्ये आहे. तीच तुमची शक्ती असून तिचा योग्य वापर करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी पालकमंत्री म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची ग्वाही देखील दिली.

राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील संबोधित केले. मुल चंद्रपूर येथील संस्कार घेऊन वाढलेले लोकायुक्त मदनलाल टहलियानी, आमच्या सुसंस्कृत संस्कारी कुटुंब व्यवस्थेचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टहलियानी म्हणजेच प्रामाणिकपणा आणि हाच प्रामाणिकपणा त्यांनी आपल्या न्यायदानाच्या दायित्वामध्ये दाखवून दिल्याचे स्पष्ट केले. प्रेस क्लबने आयोजित या कार्यक्रमाचे कौतुक करत त्यांनी शुभवार्ता देणाऱ्या पत्रकारितेचा पाया येथील पत्रकार संघटनांना असल्याचे गौरवाने नमूद केले. यावेळी जग बदलणे अतिशय सोपे आहे. मात्र त्याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सत्कार मूर्ती व आज चंद्रपूर गौरव सन्मान सोहळ्याने सन्मानित मदनलाल टहलियानी यांनी आजचा सत्कार मुल आणि चंद्रपूर येथील समस्त जनतेला समर्पित केला. कुख्यात अजमल कसाब याचा खटला न्यायमूर्ती टहलियानी यांच्याच न्यायालयात चालला होता. या खटल्यात न्यायदान करताना वर्तमानपत्रात येणाऱ्या या मजकुराचा यावेळी त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. माध्यमांची भूमिका विशद करताना सुदृढ समाज निर्मितीसाठी पत्रकारितेचा  वसा आपण घेतल्याचे समजून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

यावेळी प्रेस क्लब सोबतच अनेक संघटनांकडून  झालेल्या  सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले ,आपल्या कडून मिळालेल्या बालपणीच्या संस्कारातून, त्यावेळी झालेल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीतून कठीण वेळी योग्य निर्णय घेण्याचे धारिष्ट्य आपल्याला प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायाधीशांचा स्थायीभाव हा प्रामाणिकपणाच असतो. ज्ञानाचा दुरुपयोग त्याच्याकडून होऊ नये हीच अपेक्षा असते. त्यामुळे न्यायाधीशाची भूमिका नोकरी म्हणून न करता दायित्व म्हणून आपण निभावली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांनी यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कोणताही काळ असू द्या. कोणाच्या दबावात काम करणे हा पत्रकारांचा स्वभाव असू शकत नाही. अशा प्रकारच्या दबावाचे वर्णन करणारे व पळवाट काढणारे पत्रकार असू शकत नाही. तुमचे ऐकायला समाज तयार आहे. तुम्हाला दाद द्यायला यंत्रणा तयार आहे. तुम्ही बोलणे मात्र सोडू नका. व्यवस्थेच्या विरुद्ध बोलणे.सातत्याने सुरू ठेवा. कारण ती तुमची ओळख आहे.ती समाजाची आपल्याकडून अपेक्षाही आहे. तेच आपले दायित्व आहे. तेच आपण समाजाचे देणे लागतो. म्हणून पत्रकारितेत हे दायित्व लक्षात घ्या,असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी दिल्लीमध्ये दंगलीचे कव्हरेज करत असताना आजही अनेक धाडसी पत्रकार आपला जीव धोक्यात टाकून वस्तुस्थिती बाहेर आणण्यासाठी धडपडत होते. दोघांना गोळ्या लागल्या. तर किमान बारा ते पंधरा पत्रकार जखमी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समाजाला सत्य देण्याचे दायित्व कठीण प्रसंगात पार पाडणारा तोच खरा पत्रकार असतो,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय तायडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन संजय रामगिरवार, आभार प्रदर्शन रवींद्र जुनारकर यांनी केले. या कार्यक्रमात चंद्रपूर येथील आश्रम शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केले त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या 40 वर्षांपासून वृत्तपत्र वाटप करणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या हॉकर्सचा सत्कार करण्यात आला. वंदना दखणे या वृत्तपत्र वाटप करणाऱ्या भगिनीचा सत्कार विशेष उल्लेखनीय ठरला.

No comments:

Post a Comment

पर्यटकाच्या वाहनाला अपघात, 1 मृत्यु, 4 जख्मी Accident Tadoba

पर्यटकाच्या वाहनाला अपघात, 1 मृत्यु, 4 जख्मी चंद्रपूर , 1दिसम्बर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या चिमूर ते कोलारा मार्गावर तुकूम ...